टीम इंडियाचा विंडीज दौरा ३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत – विंडीज यांच्यात ३ टी २०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विंडीजच्या संघाला सामोरा जाणार आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या, राहुल चहर, दिपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, नवदिप सैनी आणि खलिल अहमद यांसारख्या अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. परंतु प्रतिभावान फलंदाज शुभमन गिल आणि अनुभवी मुंबईकर खेळाडू अजिंक्य रहाणे यांचा विचार करण्यात करण्यात आला नाही, याबाबत माजी कर्णधार सौरव गांगुली याने नाराजी व्यक्त केली आहे.

सौरव गांगुली याने ट्विट करून निवड समितीच्या निर्णयावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या भारताकडे असे अनेक खेळाडू आहेत जे तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करू शकतात. असे असूनही शुभमन गिल, अजिंक्य रहाणे यासारख्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले नाही याचे मला आश्चर्य वाटते. आता अशी वेळ आली आहे की निवड समितीने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि लय कायम राखण्यासाठी तीनही प्रकारच्या क्रिकेटसाठी एकाच संघाची निवड करावी. क्रिकेटचे तीनही प्रकार खेळणारे खूप कमी खेळाडू आहेत. चांगल्या संघात समान खेळाडू सर्व प्रकारचे क्रिकेट खेळतात. सगळ्यांना खुश करणं हा यामागचा उद्देश नसावा. त्यापेक्षा सर्वोत्तम संघ निवडावा आणि त्यांना तीनही प्रकारचे क्रिकेट खेळावेत, असा सल्ला गांगुलीने दिला.

दरम्यान या दौऱ्यासाठी भारतीय संघाची रविवारी निवड करण्यात आली. निर्धारित षटकांसाठी वेगळा आणि कसोटी क्रिकेटसाठी वेगळा कर्णधार अशी पद्धत भारतीय संघात येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष होते, पण तीनही प्रकारांमध्ये विराट कोहली याच्याकडेच टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने माघार घेतल्यामुळे विंडीज दौऱ्यात ऋषभ पंत याला संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांना एकदिवसीय व टी-२० संघातून विश्रांती देण्यात आली आहे.