भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने चौथ्या सामन्यात १६२ धावांची दमदार खेळी केली. चौथ्या स्थानावर फलंदाजी करणाऱ्या रायडूनेही ८१ चेंडूत १०० धावांची खेळी केली. रायडूने शतकी खेळी करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. रोहत-रायडूच्या द्विशतकी भागिदारीच्या जोरावर भारताने वेस्टइंडिजचा २२४ धावांनी पराभव केला. दमदार प्रदर्शन केल्यानंतर रोहित म्हणाला की, वर्ल्डकपसाठीच्या संघात अजून कोणाचेही स्थान पक्के नाही.

शतकी खेळीनंतर रोहित म्हणाला की, ‘वर्ल्डकपसाठी आणखी काहीही निश्चित सांगू शकत नाही. वर्ल्डकपसाठी आणखी बराच कालावधी आहे. वर्ल्डकपसाठीच्या संघात अजून कोणाचेही स्थान पक्के नाही. रायडूने आजच्या सामन्यात आपली नैसर्गिक फलंदाजी केली. रायडूने कर्णधाराचा विश्वास सार्थ केल्याचे पाहून मी आनंदी आहे. वर्ल्डकपपूर्वी भारताला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळायचे आहे. न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ वर्ल्डकप खेळणार आहे. न्यूझीलंडमध्ये चेंडू खूप स्विंग होतो, तशा परिस्थितीत रायडू आपली कामगिरी चोख बजावेल अशी मला अशा आहे.’ रायडूचे कौतुक करताना रोहित शर्मा म्हणाला, ‘ रायडूच्या तुफानी फलंदाजीने चौथ्या क्रमांकाची सर्व चिंता मिटली आहे. वर्ल्डकपपर्यंत चौथ्या क्रमांकावर कोणतीही चर्चा होणार नाही.

वर्ल्डकपमध्ये अंबाती रायडूचे स्थान पक्के, विराट कोहलीचे संकेत –  

चौथ्या सामन्यानंतर बोलताना कोहली म्हणाला की, ‘अंबाती रायडूने मिळालेल्या संधीचे सोनं केले आहे. सामन्यातील परिस्थिती ओळखून तो फलंदाजी करतो. चौथ्या क्रमांकावर एक चांगला पर्याय मिळाल्यामुळे आम्ही आनंदात आहे. आपण रायडूला २०१९ च्या विश्वचषकापर्यंत संधी द्यायला हवी.’ ‘या शतकी खेळीने रायडूने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्याच्या शतकी खेळीनंतर आशा करतो की वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाबाबत चिंता मिटली आहे. तणावाच्या परिस्थितीत रायडू चांगली कामगिरी करतो. त्याला आम्ही बऱ्याच वर्षांपासून ओळखतो आणि तो चांगली खेळी खेळू शकतो,’ असेही विराट म्हणाला.

दरम्यान चौथ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजला भारताकडून २२४ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताच्या ३७७ धावांमध्ये रोहित शर्माने १६२ तर रायडूने १०० धावा ठोकल्या. या विजयाबरोबर भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. ३७८ धावांचा पाठलाग करताना विंडीजची फलंदाजी ढेपाळली आणि त्यांना १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. हा भारताचा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला.