विश्वचषकात उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. शनिवारी आणि रविवारी अमेरिकेतल्या फ्लोरिडा येथील शहरात भारतीय संघ २ टी-२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यात बीसीसीआयच्या निवड समितीने यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीऐवजी ऋषभ पंतला संधी दिली आहे. यापुढे मर्यादीत षटकांच्या सामन्यात ऋषभ पंतच यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असेल असं निवड समितीचे प्रमुथ एम. एस. के. प्रसाद यांनी स्पष्ट केलं होतं. कर्णधार विराट कोहलीनेही ऋषभला आपला पाठींबा दर्शवला असून, ऋषभकडे स्वतःला सिद्ध करण्याची संधी असल्याचं विराटने म्हटलं आहे.

“ऋषभकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे, त्यामुळे विंडीज दौऱ्यात त्याला स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. ऋषभ गुणवान खेळाडू आहे आणि यापुढे त्याला अधिकाधीक संधी दिली जाईल. धोनीच्या अनुभवाची आम्हाला उणीव भासेल मात्र ऋषभ सारख्या तरुण खेळाडूंना तयार करण्याची ही नामी संधी आमच्याकडे आहे.” पहिल्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली बोलत होता.

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यात ३ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत आपल्या कर्णधाराने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.