भारताने आज पहिल्या दिवसअखेर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत ४ बाद ३६४ धावा केल्या. या दिवसाचा हिरो ठरला भारताच्या पृथ्वी शॉ. स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा रतीब रचणाऱ्या मुंबईच्या या खेळाडूला इंग्लंड भ्रमंतीनंतर अखेरीस भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाले. त्याने या संधीचं सोनं करताना पदार्पणातच धडाकेबाज शतकी खेळी केली. मात्र विंडीजचा फिरकीपटू देवेंद्र बिशू याने त्याला १३४ धावांवर बाद केले.

सामन्याच्या ५१व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बिशूने त्याला स्वतः झेलबाद करून माघारी धाडले. पृथ्वीने १५४ चेंडूंत १९ चौकारांच्या मदतीने ८७.०१ च्या सरासरीने १३४ धावा केल्या. पृथ्वीच्या १३४ धावांच्या खेळीने माजी कर्णधार सौरव गांगुलीचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. गांगुलीने १९९६ साली इंग्लंडविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले होते. त्यात त्याने १३१ धावा केल्या होत्या. पृथ्वीने हा विक्रम मोडला.

पण १३४ धावांवर बाद झाल्यामुळे पृथ्वीला ४९ वर्षांपूर्वीचा गुंडप्पा विश्वनाथ यांचा धावांचा विक्रम मोडता आला नाही. विश्वनाथ यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात १३७ धावांची खेळी केली होती. अवघ्या चार धावांनी पृथ्वीला हा विक्रम मोडता आला नाही.