IND vs WI : आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पदार्पणातच शतकी खेळी करणाऱ्या सलामीवीर पृथ्वी शॉला टीम इंडियाच्या रणनीतीचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विंडीजविरूद्ध होणाऱ्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये जरी संधी देण्यात आलेली नसली, तरी उर्वरित तीन सामन्यांसाठी त्याला संघात स्थान मिळेल, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात येत आहे. पण या मागे पृथ्वीचा फॉर्म हे एकमेव कारण नसून टीम इंडियाची नवी रणनीतीदेखील फायद्याची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

भारत आणि विंडीज यांच्यातील कसोटी सामन्यातून पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावले होते. तसेच या कसोटी मालिकेचा ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्कार पृथ्वी शॉला देण्यात आला होता. पण उत्कृष्ट खेळी करूनही त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळाले नाही. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याला जागा देण्यात आली नाही. पण त्याला वगळण्यात आलेले नसून पुढच्या तीन सामन्यांमध्ये संधी दिली जाणार आहे, असे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे.

२०१९चा विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून भारताने खेळाडूंचे रोटेशन करण्याची रणनीती सुरु केली आहे. येत्या एका वर्षात चांगल्या खेळाडूंचे रोटेशन करण्यात येणार आहे. खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेआधी पुरेशी विश्रांती मिळावी हा मागचा हेतू आहे. याच रोटेशन रणनीती अंतर्गत पृथ्वीला दोन सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे पण त्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात येईल, असे बोलले जात आहे.