गुरुवारी रात्री बीसीसीआयच्या निवड समितीने, दक्षिण आफ्रिकेच्या आगामी भारत दौऱ्यासाठी टी-२० संघाची घोषणा केली. वेस्ट इंडिज दौऱ्यात मालिका विजय मिळवलेल्या भारतीय संघातील खेळाडूंनाच या संघात संधी देण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमारला विश्रांती देत निवड समितीने हार्दिक पांड्याला संघात स्थान दिलं आहे. याचसोबत महेंद्रसिंह धोनीही या मालिकेसाठी हजर नसल्यामुळे ऋषभ पंतकडेच यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवड समिती ऋषभ पंतच्या कामगिरीवर खुश नसल्याचं कळतंय.

२०२० रोजी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी निवड समिती संघ उभारणीच्या तयारीत आहे. सध्याच्या घडीला ऋषभ पंत हा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असणार आहे. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिकेत ऋषभला आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा उचलता आला नाही. ०, ४, नाबाद ६५, २०, ० अशी ऋषभची कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे निवड समितीचे सदस्य नाराज असल्याचं समोर येतंय. भारतामध्ये होणाऱ्या मालिकेत ऋषभ पंत चांगली कामगिरी करु शकला नाही तर के.एस.भारत किंवा इशान किशन किंवा संजू सॅमसन यांना संधी देण्याच्या विचारात आहे.

अवश्य वाचा – ….म्हणून आफ्रिकेविरुद्ध मालिकेत धोनीला भारतीय संघात स्थान नाही

१५ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत ऋषभ पंतच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, कृणाल पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.