भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरचा ट्वेन्टी-२० सामना आज चेन्नईत रंगणार आहे. आजच्या सामन्या भारताचा कर्णधार रोहित शर्मा अनेक विक्रम करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घालणारा हिटमॅन आज विराट विक्रम करत नव्या उंचीवर पोहचण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात १११ धावांची नाबाद खेळी करत विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला होता. टी-२०मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम सध्या रोहितच्या नावावर आहे. पूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. आज होणाऱ्या सामन्यात रोहितने ६९ धावांची खेळी केल्यास टी-२० मध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा होईल. सध्या न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलच्या नावावर हा विक्रम आहे. गप्टीलचा विक्रम मोडीत काढण्यासाठी रोहितला ६९ धावांची गरज आहे. रोहितने ८६ टी-२० सामन्यात ३३.८९ च्या सरासरीने २२०३ धावा केल्या आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावासोबतच रोहित शर्मा नवा षटकार किंग होणार आहे. टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार गप्टील आणि गेलच्या नावावर आहेत. यांच्या नावावर प्रत्येकी १०३ षटकार आहेत. रोहित शर्मा ९६ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या सामन्याप्रमाणे आजच्या सामन्यात रोहितने धडाकेबाज फलंदाजी केल्यास टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार त्याच्या नावावर होतील. यासाठी रोहितला ८ षटकारांची गरज आहे.

२०१८ मध्ये रोहित शर्मा ने १५ टी-२० सामन्यात ५५६ धावा काढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये या हंगामात सर्वाधिक धावा पाकिस्तानच्या फखर जमानच्या नावावर आहे. फखरच्या नावावर १७ टी-२० सामन्यात ५७६ धावा आहेत. रोहितला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी २१ धावांची गरज आहे.

आज होणाऱ्या सामन्यात रोहितने चार षटकार आणि एक चौकार लगावल्यास आणखी एक विक्रम रोहितच्या नावावर होणार आहे. जर रोहितने अशी कामगिरी केल्यास टी-२० १०० षटकार आणि २०० चौकार लगावणारा जगातील दुसरा तर भारताचा पहिला खेळाडू ठरणार आहे. असा पराक्रम न्यूझीलंडच्या गप्टीलने केला आहे.