विंडीजविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने अंतिम सामन्यात ९ गडी राखून विजय मिळवला. हा भारताचा विंडीजविरुद्ध सलग आठवा मालिका विजय ठरला. विंडीजचा डाव अवघ्या १०४ धावांत गुंडल्यानंतर भारताने हे आव्हान १५ षटकाच्या आत पूर्ण केले. रवींद्र जाडेजाचे ४ बळी आणि रोहित शर्माची नाबाद अर्धशतकी खेळी याच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि मालिका ३-१ने खिशात घातली. रवींद्र जाडेजाला सामनावीर तर विराटला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले आणि विराट कोहलीच्या नेतृत्वकौशल्याचेही कौतुक झाले.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने या सामन्याच्या काही काळ आधीच कोहलीची तोंडभरून स्तुती केली. कोहली हा सर्वकालीन क्रिकेटमधील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे, असे तो म्हणाला. पण त्याबरोबरच कोणत्याही प्रकारच्या तुलनांवर माझा विश्वास नाही, असेही त्याने स्पष्ट केले.

गेल्या काही काळात विराट कोहलीच्या खेळात प्रचंड सुधारणा झाली आहे. त्याच्या खेळात कायम मला एक चमक आणि ऊर्जा दिसली. तो सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे, असे माझे आधीपासूनच मत होते. केवळ याच पिढीतील नव्हे तर सर्व पिढ्यांमधील तो सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे, असे सचिन म्हणाला.

कोहलीची सचिनशी तुलना करण्याबाबत तो म्हणाला की क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाल्यापासून ते आजच्या काळातील क्रिकेटमध्ये दरवेळी बदल घडून आले आहेत. त्यामुळे माझा तुलनांवर विश्वास नाही. मी माझ्या काळात २४ वर्षे क्रिकेट खेळलो. विराट सध्या क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याप्रकारे तुलना करणे योग्य नाही, असे मत सचिनने व्यक्त केले.