भारतीय क्रिकेट संघ विंडीज दौऱ्यावर आहे. उद्यापासून भारताची विंडीजविरुद्ध टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत पहिले २ सामने अमेरिकेत होणार असून तिसरा सामना विंडीजला होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला विराटने एक पत्रकार परिषद घेतली. यात विराटला विविध प्रश्न विचारण्यात आले. त्याच वेळी अमेरिकेतील क्रिकेटच्या प्रगतीबाबत विराटला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विराटने अतिशय छान उत्तर दिले.

“अमेरिकेत क्रिकेटचे सामने होणे महत्वाचे आहे. आम्ही अमेरिकेत जेवढे जास्त सामने खेळू, तेवढा क्रिकेटला फायदा होईल. अमेरिकेतील जनतेला क्रिकेटमध्ये आवड निर्माण होईल आणि त्यांना क्रिकेटबद्दल जाणून घ्यायला आवडेल. टी २० सामने हे कमी वेळेचे असतात. तसेच ते क्रिकेट सामने रोमांचकी होतात, त्यामुळे अमेरिकेत टी २० क्रिकेट लोकप्रिय आहे. येत्या काळात क्रिकेटला अजून प्रोत्सहन मिळेल आणि अमेरिकेत जास्तीत जास्त क्रिकेट सामने होतील अशी अपेक्षा आहे, असे विराटने सांगितले.

“विंडीजविरुद्धच्या टी २० मालिकेपासूनच भारतीय संघ टी २० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवातून भारतीय संघ पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने संघबांधणी करण्यावर आम्ही भर देत आहोत. विश्वचषकात चांगली कामगिरी करणारा पण दुखापतीमुळे माघार घ्यावी लागलेला शिखर धवन आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे”, असेही कोहली म्हणाला.

दरम्यान, २०२० मध्ये रंगणाऱ्या विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेला अवघे १५ महिने शिल्लक राहिले असताना भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाचा प्रश्न तसेच महेंद्रसिंह धोनीची भविष्यातील निवृत्ती या सर्वावर तोडगा काढावा लागणार आहे. नव्या खेळाडूंना संधी देण्यावर आपण भर देणार असल्याचे कोहलीने या दौऱ्यासाठी रवाना होण्याआधीच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. कोहलीला या दौऱ्यासाठी विश्रांती देणार असल्याची चर्चा होती; पण निवड समितीने जसप्रीत बुमराचा अपवाद वगळता पूर्ण क्षमतेचा संघ निवडला आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याला संपूर्ण दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.