यजमान वेस्ट इंडिजसमोर टी-२०, वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही व्हाईटवॉश स्विकारण्याची नामुष्की आलेली आहे. जमैका येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने विंडीजला विजयासाठी ४६८ धावांचं आव्हान दिलं. तिसऱ्या दिवसाअखेरीस या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची अवस्था ४५/२ अशी दयनीय झाली आहे. भारताने आपला दुसरा डाव १६८/४ वर घोषित करुन वेस्ट इंडिजला विजयासाठी आव्हान दिलं. यानंतर मैदानात आलेल्या विंडीजच्या सलामीवीरांना इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने माघारी धाडलं.

विंडीजचा पहिला डाव ११७ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताने फॉलोऑन देण्याऐवजी दुसऱ्या डावात फलंदाजी करणं पसंत केलं. दुसऱ्या डावातली भारताचे सलामीवीर फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. लोकेश राहुल आणि मयांक अग्रवालला केमार रोचने माघारी धाडलं. यानंतर चेतेश्वर पुजाराने थोडीशी झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ही जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. विराट कोहलीही भोपळा न फोडता रोचच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर उप-कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. दोघांनीही अर्धशतकी खेळी साकारत भारताला १५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. अजिंक्य रहाणेने नाबाद ६४ तर हनुमा विहारीने ५३ धावांची खेळी केली.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या विंडीजच्या क्रेग ब्रेथवेटला इशांत शर्माने यष्टीरक्षक पंतकडे झेल द्यायला भाग पाडलं. यानंतर कॅम्पबेल आणि ब्राव्हो यांची छोटेखानी भागीदारी रंगली. यानंतर विराट कोहलीने तात्काळ मोहम्मद शमीला गोलंदाजी देत, विंडीजला धक्का दिला. शमीने कॅम्पबेलला कर्णधार विराट कोहलीच्या हाती झेल द्यायला भाग पाडत विंडीजला दुसरा धक्का दिला. अखेरीस तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीजने ४५ धावांपर्यंत मजल मारली होती. हा सामना जिंकण्यासाठी विंडीजला अजुनही ४२३ धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे चौथ्या दिवसाच्या खेळात विंडीजचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.