पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने यजमान विंडीजला तब्बल ३१८ धावांनी पराभूत केले आणि मोठा विजय संपादन केला. ४१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये आटोपला. या डावात जसप्रीत बुमराहने ८ षटके टाकून केवळ ७ धावांमध्ये ५ गडी टिपले. त्याच्या या कामगिरीच्या बळावर बुमराहने एक विक्रम रचला. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि विंडिजमध्ये एका डावात ५ बळी टिपणारा बुमराह आशियातील पहिला गोलंदाज ठरला.

या विक्रमी कामगिरीवर जसप्रीत बुमराहने आपल्या भावना व्यक्त केल्या. “विंडिजच्या खेळपट्टीवर चेंडू स्विंग होण्यास मदत मिळत होती, त्यामुळे आम्ही स्विंग गोलंदाजीवर भर दिला. आम्हां वेगवान गोलंदाजांचा एकमेकांशी चांगला समन्वय होता. पहिल्या डावात क्रॉस सीम गोलंदाजी करण्याचा प्लॅन आम्ही आखला आणि त्याप्रकारे गोलंदाजी केली. गोलंदाजी करताना आम्ही एकमेकांना सल्ले देत होतो. पण मला पहिल्या जावात हवी तशी गोलंदाजी जमली नाही. त्या चूका सुधारून मी दुसऱ्या डावात मात्र चांगली कामगिरी केली आणि मला त्याचा अभिमान आहे”, अशा भावना जसप्रीत बुमराहने व्यक्त केली.

“मला खूप आनंद झाला. गोलंदाजी करताना आम्ही आक्रमक राहिलो त्याचा आम्हाला फायदा झाला. मी आणि इशांत दोघांनीही क्रीजचा चांगला वापर केला. त्यामुळे आम्हाला गतीसोबतच चांगला स्विंगदेखील मिळाला. गोलंदाजी करताना मला खूप परिश्रम घ्यावे लागत होते. सुरूवातीच्या काळात मी इनस्विंगर गोलंदाजी अधिक करायचो. पण जसेजसे मी अधिकाधिक कसोटी सामने खेळलो, तसे मला आऊटस्विंगबद्दलही विश्वास निर्माण झाला. इंग्लंड दौऱ्यापासून मी आऊटस्विंगचा जास्तीत जास्त वापर करू लागलो. त्याच्याच मला फायदा झाला”, असेही त्याने सांगितले.

याशिवाय, बुमराहने ट्विट करत परदेशातील सर्वात मोठ्या विजयाबाबत आनंद व्यक्त केला.