भारताची विंडीजविरुद्ध रविवारपासून टी२० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत भारताचा युवा संघ मैदानात उतरणार असून संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. भारतीय संघाला IPLमुळे टी२० क्रिकेटचा पुरेपूर अनुभव आहे. पण IPLच्या संघाकडून खेळताना आणि भारतीय संघाकडून खेळताना खेळाडूंच्या कामगिरीत फरक दिसतो हा इतिहास आहे. त्यामुळे या दोन गोष्टींमधील फरक टीम इंडियाने समजून घ्यायला हवा, असा इशारा भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी दिला आहे.

विराट कोहलीला या मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. त्यामुळे विंडीजचा संघ भारताच्या खेळाडूंवर दबाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. पण असे असले तरी भारताकडे प्रतिभावान टी२० खेळाडू आहेत. त्यांना IPLचा अनुभव आहे. फक्त IPL आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये खेळताना खेळाडूंच्या खेळात तफावत दिसून येते हा इतिहास आहे, असे त्यांनी नमूद केले.

भारताने संघात मध्यमगती गोलंदाजांना स्थान दिले आहे. विंडीजचे फलंदाज मोठे फटके मारण्यात पटाईत आहेत. त्यामुळे भारताने वेगवान गोलंदाजांऐवजी मध्यमगती गोलंदाजांना पसंती दिली आहे. पण विंडीजकडे असे फलंदाज आहेत, जे चुकीचे फटके खेळले तरीही चेंडू पॅव्हेलियनमध्ये जाऊ शकतो, असेही गावसकर म्हणाले. तसेच, धोनीच्या अनुपस्थितीमध्ये पंत आणि कार्तिक यांना संघातील आपली जागा बळकट करण्याची संधी आहे. त्यानुसार त्यांनी खेळ करावा, असा सल्लादेखील त्यांनी दिली.