विंडिजविरुद्धचा भारताचा पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. गयाना येथे दिवसभर पावसाने हजेरी लावल्यामुळे मैदानाच्या बऱ्याच भागावर पाणी साचले होते. पावसाने उसंत घेतल्यानंतर सामन्याला सुरुवातही झाली होती, मात्र तिसऱ्यांदा पावसाने हजेरी लावल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन दोन्ही पंचांनी सामना रद्द करण्याचा अंतिम निर्णय घेतला.

गयानामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना सुरु होण्यास विलंब झाला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्याबाबत बोलताना विराट म्हणाला की (पाऊस हा) क्रिकेटमधील सर्वात वाईट गोष्ट आहे. सातत्याने सामना थांबवणे, पुन्हा सुरू करणे, पुन्हा थांबवणे यामुळे खेळाची मजा निघून जाते. एक तर धो-धो पाऊस कोसळावा किंवा मग छानपैकी पूर्ण सामना खेळता यावा. पावसामुळे सामना जेवढ्या वेळा थांबतो, तेवढ्या वेळा खेळाडूंना मैदानावर गेल्यावर इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागते.

दरम्यान, विंडीजच्या सलामीवीरांनी सामन्यात संथ सुरुवात केली होती. सहावं षटक सुरु असताना विंडीजचा संघ १० धावाही ओलांडू शकला नव्हता. तेवढ्यातच आलेल्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला. पावसाचा जोर ओसरल्यानंतर सामन्यांनी खेळपट्टीची पाहणी केली. यानंतर डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर सामना ४० षटकांचा करण्यात आला. मात्र खेळाडू मैदानात आल्यानंतर मैदानाचा काही भाग पावसामुळे ओला राहिल्याचं विराट कोहलीला आढळून आलं.

विराटने दोन्ही पंचांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यानंतर हा भाग दुरुस्त करण्यासाठी आणखी काहीवेळ खर्च झाला. अखेरीस हा भाग सुकवल्यानंतर दोन्ही पंचांनी खेळपट्टीची पाहणी करत सामना ३४ षटकांचा केला. सलामीवीर ख्रिस गेलला कुलदीप यादवने आपल्या गोलंदाजीवर माघारी धाडत विंडीजला पहिला धक्का दिला. यानंतर एविन लुईसने फटकेबाजी करत यजमान संघाला ५० धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे पंचांनी खेळ थांबवला. यानंतर पावसाची संततधार कायम राहिल्यामुळे पंचांनी दोन्ही कर्णधारांच्या अनुमतीने सामना रद्द झाल्याचं जाहीर केलं.

लोकसत्ता समालोचन