भारत आणि विंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. ही मालिका टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेअंतर्गत खेळण्यात येणार आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. तशातच भारताविरूद्धचा सामना सुरू होण्याआधीच विंडिजच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे. विंडिजचा मध्यमगती गोलंदाज किमो पॉल याला सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी मिग्युअल कमिन्स याला संघात स्थान देण्यात आले आहे. विंडिज क्रिकेट मंडळाच्या हंगामी निवड समितीने ही माहिती दिली.
२८ वर्षीय कमिन्सने ३ वर्षांपूर्वी भारताविरूद्धच्या सामन्यातून क्रिकेटमध्ये पदार्पणाचा सामना खेळला होता. सेंट लुसिया येथील दुसऱ्याच कसोटी सामन्यात त्याने ९ बळी टिपले होते. त्यातील एका डावात त्याने सर्वोत्तम कामगिरी करत ४८ धावांत ६ गडी बाद केले होते. डाव्या पायाच्या दुखापतीमुळे किमो पॉलला सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी कमिन्सला संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, भारत-विंडिज ही २ सामन्यांची ही मालिका असून टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत गुणांचे खाते उघडण्यासाठी दोनही संघ दमदार तयारी करत आहेत. भारत-विंडिज पहिला सामना २२ ते २६ ऑगस्ट तर दुसरा सामना ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा विविध टप्प्यात चालणार असून २ वर्षांनी या स्पर्धेची अंतिन फेरी खेळवण्यात येणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटचा स्तर उंचावेल, असे मत या स्पर्धेबाबत बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले आहे.
भारतीय संघ कसा असेल? याबद्दलही विराटने उत्तर दिले. तो म्हणाला की कोणत्या खेळाडूंना अंतिम ११ मध्ये संधी द्यायची याचा विचार आम्ही अजूनही करत आहोत. खेळपट्टीचा आम्हाला अद्याप अंदाज नाही. खेळपट्टीनुसार आम्ही आमचा अंतिम संघ ठरवू शकतो. संघात ३ वेगवान गोलंदाज व १ फिरकीपटू किंवा २ वेगवान गोलंदाज आणि २ फिरकीपटू असे कॉम्बिनेशन असू शकते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 22, 2019 12:26 pm