कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या भारताच्या पहिल्याच सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. जसप्रीत बुमराहने ५, इशांत शर्माने ३ आणि मोहम्मद शमीने २ बळी टिपत विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये गुंडाळला. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने यजमान विंडीजवर तब्बल ३१८ धावांनी मोठा विजय संपादन केला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने इतिहास रचला. परदेशात खेळलेल्या कसोटी समान्यांपैकी हा भारताचा सर्वात मोठा विजय ठरला.

४१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. रहाणे आणि विहारी यांच्या खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला विजयासाठी ४००हुन अधिक धावांचे अंतिम लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांची पुरती दैना उडाली. त्यांच्या ७ फलंदाजांवर एकेरी धावसंख्येवर तंबूत परतण्याची नामुष्की ओढवली. जसप्रीत बुमराहने विंडीजच्या फलंदाजांची फार बिकट अवस्था करून ठेवली. त्याने टिपलेल्या ७ धावांत ५ बळींच्या जोरावर भारताने विंडीजची अवस्था ९ बाद ५० अशी केली होती. मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांनी भेदक मारा करत त्याला चांगली साथ दिली. भारताच्या वेगवान त्रिकुटापुढे विंडीजचे फलंदाज हतबल झाले. विंडीजने १० व्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी केली, पण केमार रोचला माघारी पाठवत इशांतने भारताला परदेशी भूमीवरील सर्वात मोठा विजय मिळवून दिला.

विंडीजकडून केवळ तीन खेळाडूंना दोन आकडी धावसंख्या गाठता आली. त्यातही ८ व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या केमार रोचने सर्वाधिक ३८ धावा केल्या. भारतातर्फे बुमराहने ५, इशांतने ३ तर शमीने २ गडी टिपले.

दरम्यान, सामन्यात रहाणेने पहिल्या डावात ८१ तर दुसऱ्या डावात १०२ धावांची खेळी केली. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.