भारत आणि विंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. ही मालिका टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेअंतर्गत खेळण्यात येणार आहे. २ सामन्यांची ही मालिका असून टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत गुणांचे खाते उघडण्यासाठी दोनही संघ दमदार तयारी करत आहेत. भारत-विंडिज पहिला सामना २२ ते २६ ऑगस्ट तर दुसरा सामना ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा विविध टप्प्यात चालणार असून २ वर्षांनी या स्पर्धेची अंतिन फेरी खेळवण्यात येणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटचा स्तर उंचावेल, असे मत या स्पर्धेबाबत बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले आहे.

“विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटला एक नवी ओळख आणि दृष्टी मिळेल. कसोटी क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलेल. जेव्हा प्रत्येक सामन्यात तुम्हाला गुण मिळवायचे आहेत हे तुमच्या डोक्यात असते, तेव्हा प्रत्येक सामना हा अत्यंत महत्वाचा ठरतो. या स्पर्धेमुळे संघातील स्पर्धा आणखी तीव्र होईल. कसोटी क्रिकेट सामन्यांकडे अधिक लक्ष पुरवलं जाईल आणि सामने अधिक रंगतदार होतील. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटचा स्तर उंचावण्यास मदत होईल”, असे विराट म्हणाला.

भारतीय संघ कसा असेल? याबद्दलही विराटने उत्तर दिले. तो म्हणाला की कोणत्या खेळाडूंना अंतिम ११ मध्ये संधी द्यायची याचा विचार आम्ही अजूनही करत आहोत. खेळपट्टीचा आम्हाला अद्याप अंदाज नाही. खेळपट्टीनुसार आम्ही आमचा अंतिम संघ ठरवू शकतो. संघात ३ वेगवान गोलंदाज व १ फिरकीपटू किंवा २ वेगवान गोलंदाज आणि २ फिरकीपटू असे कॉम्बिनेशन असू शकते.