वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बाजी मारत २ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने दुसऱ्या डावात शतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आजपासून जमैकाच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. यावेळी अजिंक्यने पत्रकारांशी संवाद साधला. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर झळकावलेलं शतक आपल्यासाठी खास असल्याचंही अजिंक्यने यावेळी नमूद केलं.

“पहिल्या कसोटीदरम्यान झळकावलेलं कारकिर्दीतलं दहावं शतक हे माझ्यासाठी विशेष होतं. मी सेलिब्रेट कसं करायचं हे काही ठरवलं नव्हतं, ते आपसूक घडून गेलं. मी थोडासा भावूकही झालो होतो. या शतकासाठी मला दोन वर्ष वाट पहावी लागली. गेली दोन वर्ष मी सतत माझा खेळ सुधारण्याकडे भर देत होतो. याचसाठी हे दहावं शतक माझ्यासाठी विशेष आहे.” दुसऱ्या कसोटीआधी अजिंक्य पत्रकारांशी बोलत होता.

अवश्य वाचा – Ind vs WI : पहिल्या कसोटीत अजिंक्यने केलेला हा विक्रम तुम्हाला माहिती आहे का?

अँटीग्वा कसोटीत पहिल्या डावामध्ये भारतीय फलंदाजांनी खराब सुरुवात केल्यानंतर, अजिंक्यने ८१ धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला होता. दुसऱ्या डावात अजिंक्यने विराट कोहलीच्या साथीने शतकी भागीदारी करत आपलं शतक झळकावलं. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.