भारत आणि विंडीज यांच्यात आजपासून पहिली कसोटी सुरु झाली. या सामन्यातून मुंबईचा तरुण फलंदाज पृथ्वी शॉ याने आपले कसोटी पदार्पण केले. इतकेच नव्हे तर पदापर्णतच पृथ्वीने अर्धशतक झळकावले आणि आपली निवड सार्थ ठरवली. याबरोबर पृथ्वीच्या समावेशामुळे एक अनोखा योगायोग जुळून आला आहे. तब्बल १४० वर्षानंतर शॉ या आडनावाचा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. आल्फ्रेड शॉ यांनी १५ मार्च १८७७ साली इंग्लंडकडून पहिला कसोटी सामना खेळला होता.

आल्फ्रेड शॉ यांनी इंग्लंडकडून एकूण ७ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी १११ धावा केल्या आणि १२ बळी टिपले. यातही एकदा त्यांनी एका डावात ५ बळी टिपले होते.

आल्फ्रेड शॉ

याशिवाय, पृथ्वीने पहिल्याच कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावत इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पृथ्वी शॉने आपलं स्थान पक्क केलं. पृथ्वीने ५६ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि लाला अमरनाथ यांना मागे टाकलं. तसेच पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक करणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. त्याच्या बरोबर सलामीला आलेल्या लोकेश राहुलला मात्र भोपळाही फोडता आला नाही. त्याला कर्णधार गॅब्रियल याने पायचीत केले. पण पृथ्वीने मात्र आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले.