भारतीय संघ सध्या विंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरूवात टी २० मालिकेने झाली असून मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज गयाना येथे होणार आहे. या मालिकेतील पहिले २ सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झाले. या दोनही सामन्यात भारताने विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या दोन सामन्यात भारतीय फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पण स्पर्धेआधी चाहत्यांच्या मनात असलेल्या एका महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर मात्र जवळपास मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात वाद असल्याच्या चर्चा क्रिकेटवर्तुळात सुरू आहेत. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघातील मतभेद सर्वप्रथम उघड झाले. मग उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघात गटबाजीचे राजकारण, विराट-रोहित यांच्यात मतभेद अशी वृत्ते प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाली होती. विराटने हे वृत्त साफ फेटाळून लावले आहे. तशातच सध्या ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ चर्चेत आहे.

या Video मध्ये भारताचा फिरकीपटू रवींद्र जाडेजा आणि सलामीवीर रोहित शर्मा हे ‘डम्ब-शेर-आज’ हा खेळ खेळताना दिसले आहेत. यात रोहितने एक छोटा फलक जाडेजाला दाखवला. त्यावर विराटचे नाव होते, पण त्यावर काय लिहीले आहे हे रोहितला माहिती नव्हते. जाडेजाने केलेल्या हावभावावर त्याला तो खेळाडू कोण आहे ते ओळखायचे होते. जाडेजाने केलेल्या हावभावामुळे त्याने विराटचे नाव बरोबर ओळखले. त्यानंतर कॅमेरा दुसरीकडे फिरवल्यानंतर विराटही तेथेच बसला असून त्यांचा खेळ एन्जॉय करताना दिसला.

दरम्यान, पहिल्या दोन सामन्यात मालिका जिंकल्यामुळे तिसऱ्या सामन्यात इतर खेळाडूंना संधी देण्यात येणार असल्याचे संकेत विराटने दिले आहेत.