पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विडिंजचा तब्बल ३१८ धावांनी दारूण पराभव करत ‘विराट’ विजय साजरा केला. या विजयासह भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. भारताबाहेर सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. याआधी हा विक्रम माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर होता.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने १२ कसोटी विजय मिळवले. विराट कोहलीने २६ व्या सामन्यात हा करिष्मा केला आहे. गांगुलीने २८ सामन्यात ११ विजय मिळवले होते. विराट कोहलीने हा विक्रम मोडीत काढला आहे..

कोहलीच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात दोन, इंग्लंडमध्ये एक, श्रीलंकामध्ये पाच आणि विडिंजमध्ये तीन कसोटी सामने जिंकले आहेत. गांगुलीच्या नेतृत्वात (२०००-२००५) भारताने बांगलादेश आणि झिम्बाब्वेमध्ये प्रत्येकी तीन-तीन आणि ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि विंडिजमध्ये प्रत्येकी एक एक कसोटी सामना जिंकला आहे.

भारताबाहेर सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. त्यानंतर सौरव गांगुली दुसऱ्या तर धोनी(३० सामन्यात सहा विजय) तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. राहुल द्रविड(१७ सामन्यात पाच विजय) या यादीत चौथ्या स्थानावर विराजमान आहे.

धोनीची केली बरोबरी-
कर्णधार विराट कोहलीने विडिंजला लोळवत माजी कर्णधार धोनीचीही बरोबरी केली आहे. धोनीने ६० सामन्यात २७ विजय मिळवले होते. कोहलीने ४७ व्या सामन्यातच धोनीची बरोबरी केली आहे.

विंडिजचा १०० धावांत खुर्दा, मुंबईकर रहाणे सामनावीर

टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान विंडीजला तब्बल ३१८ धावांनी पराभूत केले आणि मोठा विजय संपादन केला. ४१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये आटोपला. जसप्रीत बुमराहने ५ आणि इशांत शर्माने ३ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. दमदार फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले.