पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिमरॉन हेटमायरचे झंझावाती शतक आणि कायरन पॉवेलचे अर्धशतक याच्या जोरावर विंडीजने भारतापुढे ३२३ धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान भारतीय खेळपट्ट्यांवर भारताला फारसे कठीण नसले तरी आव्हानात्मक आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजीकडे साऱ्यांचे लक्ष होते. सलामीवीर शिखर धवन झटपट बाद झाला. मात्र त्यानंतर विराट कोहलीने तडाखेबाज खेळी करत केवळ ३५ चेंडूत अर्धशतक ठोकले.

आशिया चषक स्पर्धेतील विश्रांतीनंतर त्याने आज एकदिवसीय संघात पुनरागमन केले. हे पुनरागमन दणक्यात तर झालेच, पण महत्वाचे म्हणजे यासह विराटने आणखी एक पराक्रम केला. विराटने फटकेबाजी करत वन डे कारकीर्दीतील ४९ वे अर्धशतक पूर्ण केले. या कामगिरीसह त्याने २०१८ या वर्षातील क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून २००० धावा करण्याचा विक्रम केला. यंदाच्या वर्षात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.

विराटने सलग दुसऱ्या वर्षी हा पराक्रम केला आहे. त्याने गेल्या वर्षी २८१८ धावा केल्या होत्या. २०१८ साली वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट चौथ्या स्थानावर आहे. त्याने १० सामन्यांत ८१३ धावा केल्या आहेत. या क्रमवारीत पहिले तीनही फलंदाज इंग्लंडचेच आहेत.