कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-२० सामन्यात २४० धावांपर्यंत मजल मारली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे टीम इंडियाने ६७ धावांनी सामना जिंकत मालिकेत २-१ ने बाजी मारली. ३ सामन्यांच्या मालिकेत आश्वासक कामगिरी केलेल्या कर्णधार विराट कोहलीला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

यासोबतच विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये मालिकावीर या नात्याने अनोखा षटकार मारला आहे. मालिकावीराचा किताब जिंकण्याची विराटची ही सहावी वेळ ठरली आहे. या यादीत एकही खेळाडू सध्या विराटच्या जवळपास नाहीये.

दरम्यान, खडतर आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची सुरुवातही खराब झाली होती. अवघ्या १७ धावांत विंडीजचे ३ फलंदाज माघारी परतले. यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कायरन पोलार्ड यांनी फटकेबाजी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. हे फलंदाज विंडीजचा डाव सावरणार असं वाटत असतानाच, कुलदीप यादवने हेटमायरचा अडसर दूर केला. मात्र यानंतरही कायरन पोलार्डने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत पोलार्डने उत्तुंग षटकार ठोकले. मात्र ६८ धावांवर पोलार्ड माघारी परतल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी हार मानली. यानंतरची भारतीय गोलंदाजांनी आपली उरली-सुरली जबाबदारी पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.