जमैकाच्या मैदानावर सुरु असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अनोख्या विक्रमाचा मानकरी ठरला आहे. नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा माघारी परतल्यानंतर विराट कोहली मैदानात फलंदाजीसाठी उतरला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा ४८ वा कसोटी सामना ठरला.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराटने सुनिल गावसकर आणि मोहम्मद अझरुद्दीन या दिग्गज कर्णधारांना मागे टाकलं.

अवश्य वाचा – Ind vs WI : ब्रायन लाराला मागे टाकत विराट कोहलीने सावरला टीम इंडियाचा डाव

कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं सर्वाधिक सामन्यांमध्ये नेतृत्व करणारे खेळाडू –

  • महेंद्रसिंह धोनी – ६० सामने
  • सौरव गांगुली – ४९ सामने
  • विराट कोहली – ४८ सामने
  • सुनिल गावसकर – ४७ सामने
  • मोहम्मद अझरुद्दीन – ४७ सामने
  • मन्सूर अली खान पतौडी – ४० सामने

पहिले दोन फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने महत्वपूर्ण भागीदारी रचत भारतीय संघाचा डाव सावरला. विराट कोहलीने ७६ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १० चौकारांचा समावेश होता. पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात २६४ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवसाअखेरीस हनुमा विहारी ४२ धावांवर तर ऋषभ पंत २७ धावांवर खेळत होता.