08 December 2019

News Flash

IND vs WI : कोहलीचा विक्रम पाहून सचिनही होईल अवाक, पहा आकडेवारी

भारताच्या विजयात विराटची शतकी खेळी

टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीचे नाबाद शतक आणि मुंबईकर श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीच्या जोरावर अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या विजयासह भारताने ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. विराटने या खेळीमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडीत काढला.

विराट कोहलीने अखेरच्या सामन्यात नाबाद ११४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने विंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. विराटने या सामन्यात १४ चौकारांची आतषबाजी केली. त्यामुळे त्याने आपल्या कारकिर्दीतील ४३ वे शतक झळकावले. महत्वाची बाब म्हणजे ४३ शतके लगावण्यासाठी त्याने सचिन तेंडुलकरपेक्षा तब्बल १८५ डाव कमी घेतले. त्याने २३० डावात ४३ शतकांचा पल्ला गाठला. सचिनने ४२५ डावात हा पल्ला गाठला होता.

दरम्यान, विडिजला २४० धावांत रोखल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयासाठी २५५ धावांचं आव्हान देण्यात आलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवन स्वस्तात बाद झाले. ऋषभ पंतही १ धावेवर माघारी परतला. त्यानंतर मुंबईकर श्रेयस अय्यरने विराटच्या साथीने शतकी (१२०) भागीदारी रचत भारताच्या डावाला आकार दिला. श्रेयस अय्यर ६५ धावांवर माघारी परतला. तर कर्णधार विराट कोहलीने केदार जाधवच्या साथीने आपल्या ४३ व्या शतकाची नोंद केली आणि सामन्यात विजय मिळवला.

त्याआधी, पावसाने व्यत्यय आणलेल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने २४० धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईसने शतकी भागीदारी करत विंडीजला आश्वासक सुरुवात करुन दिली. यानंतर पावसाने सामन्यात हजेरी लावल्यामुळे बराच वेळ वाया गेला. पाऊस थांबल्यानंतर अखेरीस १५ षटकांचा खेळ कमी करण्यात आला. सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. पण शिमरॉन हेटमायर, शाय होप यांना ठराविक अंतराने भारतीय गोलंदाजांनी माघारी धाडलं. यानंतर निकोलस पूरन आणि जेसन होल्डरने फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र ते देखील आपल्या संघाला मोठा टप्पा गाठून देऊ शकले नाहीत. भारताकडून खलील अहमदने ३ बळी घेतले.

First Published on August 15, 2019 9:13 am

Web Title: ind vs wi virat kohli sachin tendulkar 43 centuries 185 fewer innings record vjb 91
Just Now!
X