भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने ४३ धावांनी विजय मिळवला. तुलनेने सोप्या वाटणाऱ्या २८४ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव २४० धावांत आटोपला. होपच्या शतकामुळे विंडीजने २८३ धावांपर्यंत मजल मारली होती. पण विराट कोहलीने शतक ठोकूनही भारताला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. या विजयाबरोबरच विंडीजने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली असून आपल्या आशा जिवंत ठेवल्या. याबाबत विराटने सामन्यानंतर आपले मत व्यक्त केले.

आम्ही चांगली गोलंदाजी केली. ३५व्या षटकापर्यंत खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल होती, पण त्यानंतर गोलंदाजी करणे थोडेसे अवघड होऊन बसले. आम्ही खरे तर जास्तीत जास्त २५०-२६० धावांचा पाठलाग करणे अपेक्षित होते, पण आम्ही जरा जास्तच धावा खर्च केल्या. शेवटच्या षटकांमधील गोलंदाजी वगळता आम्ही चांगली गोलंदाजी केली, असे कोहली म्हणाला.

फलंदाजीबाबत बोलताना तो म्हणाला की सहसा आमचे फलंदाज भागीदारी करून सामना खिशात घालतात. पण आज आम्ही भागीदारी करू शकलो नाही. आमचे क्षेत्ररक्षण उत्तम होते. पण आम्ही आमच्या योजना नीट अमलात आणू शकलो नाही, अशी खंत त्याने व्यक्त केली.

विंडीजचा संघ आक्रमक आहे. त्यांच्याकडे स्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता या संघात आहे आणि म्हणूनच ते जिंकले, अशा शब्दात त्याने विंडीजच्या संघाचे कौतुक केले.