विराटच्या कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने विंडीजला टी२० मालिकेत ३-० अशी धूळ चारली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामना रविवारी ६ गडी राखून जिंकला आणि मालिकेवर आपले नाव कोरले. मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवनच्या ९२ धावा आणि ऋषभ पंतच्या ५८ धावांच्या बळावर भारताने १८२ धावांचे आव्हान २० षटकात पार केले.

या विजयानंतर सव स्तरातून भारतीय संघाचे कौतुक झाले. विश्वविजेत्या संघाला पराभूत केल्यामुळे आणि नियमित कर्णधारच्या अनुपस्थितीत हा विजय मिळाल्याने त्याला विशेष महत्व आले. या अभिनंदनाच्या वर्षावात एक कौतुकाची थाप ही विशेष ठरली. ती म्हणजे या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलेला नियमित कर्णधार विराट कोहली याची. विराटने सोशल मीडियावर खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंनी चांगली कामगिरी करताना आणखी एक मालिका जिंकली. त्यामुळे खेळाडू, सहकारी खेळाडू आणि सहकारी स्टाफ सर्वांचे खूप अभिनंदन, असे ट्विट त्याने केले.

दरम्यान, सामन्यात नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर हेटमायर आणि होप यांनी धडाकेबाज सुरुवात करत ६ षटकात अर्धशतक गाठले. पण त्यानंतर लगेचच होप २४ धावांवर तंबूत परतला आणि विंडीजचा पहिला गडी बाद झाला. पाठोपाठ हेटमायरही २६ धावांवर माघारी परतला. अनुभवी दिनेश रामदीनकडून विंडीजला अपेक्षा होत्या. पण तोदेखील स्वस्तात तंबूत परतला. त्याने १५ चेंडूत १५ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने त्याला त्रिफळाचित केले. त्यानंतर डॅरेन ब्राव्हो आणि निकोलस पूरन या जोडीने जोरदार फटकेबाजी केली आणि विंडीजला १८१ धावांपर्यंत मजल मारली. पूरनच्या नाबाद अर्धशतकात ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता, तर ब्राव्होच्या ४३ धावांच्या खेळीत २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.