टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान विंडीजला तब्बल ३१८ धावांनी पराभूत केले आणि मोठा विजय संपादन केला. ४१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये आटोपला. जसप्रीत बुमराहने ५ आणि इशांत शर्माने ३ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. दमदार फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मण यानेही अजिंक्यची स्तुती केली.

“अजिंक्य रहाणेची खेळी वाखणण्याजोगी होती. दोनही डावात त्याने उत्तम कामगिरी करून दाखवली. दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीत त्याला शतक झळकावता आले नव्हते. या गोष्टीचे दडपण अजिंक्यच्या मनात असणार हे नक्की. संघ व्यवस्थापनाने आणि निवड समितीने अजिंक्य रहाणेला वेळ दिला होता व पाठिंबा दर्शवला होता, पण तरीदेखील चांगली कामगिरी करायचीच हे त्याच्या मनात होते. त्याला त्याच्या खेळीची छाप सोडायची होती. ज्या क्षणी अजिंक्यने शतक झळकावले, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील समाधानच हे सारे सांगून गेले. शतक ठोकून त्याने स्वत:ला सिद्ध केले”, अशा शब्दात लक्ष्मणने अजिंक्य रहाणेची स्तुती केली.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत संधी न मिळालेल्या अजिंक्य रहाणेने कसोटी संघातील मिळालेल्या संधीचे सोने केले. सराव सामन्यात त्याने अर्धशतक झळकवून आपली चमक दाखवून दिली होती. तीच लय कायम राखत त्याने पहिल्या डावात ८१ धावांची दमदार खेळी करून दाखवली, पण त्याचे शतक मात्र हुकले. ही कसर त्याने दुसऱ्या डावात भरून काढली. विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत त्याने दुसऱ्या डावात १०२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर आणि त्याला हनुमा विहारीने (९३) दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर भारताला विंडीजला मोठे आव्हान देणे शक्य झाले. दोन डावात मिळून १८३ धावा ठोकणाऱ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले.