भारत-विंडीज दुसरा एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला. ३२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या विंडीजने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत सामना बरोबरीत सोडवला. तुलनेने दुबळ्या वाटणाऱ्या विंडीजकडून शाय होपने नाबाद १२३ धावा आणि हेटमायरने तडाखेबाज ९४ धावांची खेळी केली. विंडीजच्या या दोन फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांना चांगले चोपून काढले. केवळ कुलदीप यादवने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली आणि तीन बळी टिपले.

या सामन्याबाबत कुलदीप म्हणाला की आम्ही कठीण प्रसंगातही चांगली कामगिरी केली असे माझे वैयक्तिक मत आहे. ‘मैदानात दव होते. त्या परिस्थितीमध्ये चेंडूवर पकड मिळवणे हेदेखील खूप कठीण असते. चेंडू सारखा ओला होत होता आणि सामना पटापट पुढे सरकत होता. त्यामुळे एका क्षणी चेंडू फेकणेही माझ्या साठी अवघड जात होते, असे कुलदीप म्हणाला.

दव किंवा तत्सम अडचणी भविष्यातही येत राहतील. पण अधिकाधिक सराव करत राहणे, हाच यावर उपाय आहे. आम्ही एका वेळी खेळात नव्हतोच. सामना आमच्या हातून पूर्णपणे निसटला होता. पण आम्ही सांघिक कामगिरी केली. आम्ही एकत्रितपणे उत्तम गोलंदाजी केली आणि म्हणूनच सामना वाचवण्यात आम्हाला यश आले, असेही कुलदीपने सांगितले.