भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी शनिवारी (१० ऑगस्ट) १३ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला. या संघात ६ फूट ५ इंच उंच असलेल्या रहकीम कॉर्नवॉल याला संघात स्थान देण्यात आला आहे. विंडिजमध्ये होणाऱ्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करण्याचे कॉर्नवॉलला फळ मिळाले आहे. त्याने गेली ५ वर्षे दमदार कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीच्या बळावर त्याला संघात स्थान देण्यात आले असल्याचे विंडिजच्या हंगामी निवड समितीचे अध्यक्ष रॉबर्ट हेन्स यांनी स्पष्ट केले. पण हा अगडबंब खेळाडू आहे तरी कोण असा प्रश्न क्रिकेटरसिकांना पडल्याचे दिसते आहे.

रहकीम कॉर्नवॉल

 

रहकीम कॉर्नवॉल हा मूळचा अँटिग्वाचा खेळाडू आहे. १ फेब्रुवारी १९९३ साली जन्मलेल्या २६ वर्षीय कॉर्नवॉलची उंची सुमारे ६ फूट ५ इंच आहे तर वजन अंदाजे ३०० पौंड आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि स्पिन गोलंदाजी करतो. त्याला क्रिकेटमधील मानवी पर्वत या टोपणनावानेही ओळखले जाते.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ५ वर्षांपूर्वी पदार्पण केले. तेव्हापासून कॉर्नवेल याने वेस्ट इंडिज चॅम्पियनशीपमध्ये लीवार्ड आइसलँड्स हरिकेन्स संघाकडून आणि तसेच विंडिंज ए संघातून केलेल्या चांगल्या कामगिरीचा त्याला फायदा झाला. २०१६ मध्ये भारत दोऱ्यावर विंडिजच्या अध्यक्षीय संघाकडून खेळताना त्याने एका डावात ५ बळी टिपले होते. त्याने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५५ सामन्यांत २४ च्या सरासरीने धावा देत २६० बळी माघारी धाडले आहेत. याशिवाय, त्याने सुमारे २४ च्या सरासरीने फलंदाजी करत १ शतक आणि १३ अर्धशतके ठोकली आहेत.