भारताविरुद्धच्या टी२० मालिकेत विंडीजला ०-३ अशा दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. अखेरच्या सामन्यात विंडीजच्या संघाने चांगली झुंज दिली, पण शेवटच्या चेंडूवर १ धाव वाचवता न आल्याने विंडीजला पराभूत व्हावे लागले. पण ०-३ ने भारताने आम्हाला व्हाईटवॉश देणे ही लाजिरवाणी बाब असली, तरीही आम्ही लढलो आणि निकराची झुंज दिली, याबाबत आम्ही समाधानी आहोत, असे मत विंडीजचा टी२० कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने व्यक्त केले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

३-० अशा फरकाने पराभूत होणे हे माझ्यासाठी कर्णधार म्हणून वाईट आणि लाजिरवाणे आहे. पण आमची कामगिरी आणि आम्ही भारतीय संघाला दिलेली झुंज ही समाधानाची बाब आहे. आम्ही संघ म्हणून एकत्रित आलो आणि आमच्या संघातील खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला हेच माझ्यासाठी महत्वाचे होते आणि हेच या टी२० मालिकेचे संचित आहे, असे ब्रेथवेटने सांगितले.

पहिल्या सामन्यात आम्ही आमच्या गोलंदाजीची चुणूक दाखवून दिली आणि भारताला विजयासाठी झुंजवले. दुसऱ्या सामन्यात आम्हाला नेस्तनाबूत व्हावे लागले. पण तिसऱ्या सामन्यात आम्ही पुन्हा नव्या जोमाने खेळ केला आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेचला. त्यामुळे मला आमच्या संघाच्या चिकटीचे आणि झुंजारवृत्तीचे कौतुक वाटते, असेदेखील तो म्हणाला.