विंडीजविरुद्धचा पहिला टी२० सामना भारताने ५ गडी राखून जिंकला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या गोलंदाजांनाही केलेल्या माऱ्यापुढे विंडीजचे फलंदाज २० षटकात केवळ १०९ धावाच करू शकले. पण या माफक आव्हानाचा बचाव करताना विंडीजने उत्तम गोलंदाजी केली. त्याच्या वेगवान गोलांदाजांनी भारतीय फलंदाजांना नाकीनऊ आणले.

विंडीजचा नवोदित गोलंदाज ओशाने थॉमस याने सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. २१ वर्षीय थॉमसने भारतीय फलंदाजांना चांगलेच हैराण केले. त्याचा मारा प्रचंड वेगवान होता. त्याने टाकलेल्या ४ षटकांमध्ये केवळ एकच चेंडू ताशी १४० किमी वेगापेक्षा कमी होता. इतर सर्व चेंडू त्यापेक्षा हा जास्त वेगाचे होते. त्यामुळे भारतीय फलंदाजांची धावपळ झाली. या सामन्यात सर्वात जलद चेंडू टाकण्याचा पराक्रमही थॉमसने केला. त्याच्या या जलद माऱ्याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने एक मजेशीर ट्विट केले. अतिवेगाच्या गुन्ह्यासाठी थॉमसला दंड किंवा शिक्षा का केली जाऊ नये? असा सवाल केला.

त्याचा हा पदार्पणाचा सामना होता. या सामन्यात त्याने ४ षटके फेकत २१ धाव देऊन दोन बळी टिपले. त्यातही महत्वाचे म्हणजे फॉर्मात असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर शिखर धवन या दोघांना त्याने माघारी धाडले.