भारत आणि विंडीज यांच्यात गुरुवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला कसोटी सामना ४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान राजकोटला होणार आहे, तर दुसरा कसोटी सामना १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान हैदराबाद येथे होणार आहे. या सामन्यासाठी विंडीजचा संघ काही दिवसांपूर्वी भारतात दाखल झाला असून कसून सराव करत आहे. पण आतापर्यंतचा विंडीजच्या संघाचा इतिहास पाहता भारतात विंडीजला मालिका विजय मिळवणे ३४ वर्षात शक्य झालेले नाही.

१९८३-८४ साली झालेल्या कसोटी मालिकेत विंडीजच्या संघाने भारताला मायदेशात पराभूत केले होते. ६ सामन्यांची कसोटी मालिका विंडीजने ३-० अशी जिंकली होती. तर ३ सामने अनिर्णित राखण्यात भारताला यश आले होते. पण त्यानंतर भारत आणि विंडीज यांच्यात भारतात ५ वेळा कसोटी मालिका खेळण्यात आली. पण त्यापैकी एकही मालिका विंडीजला जिंकता आली नाही.

१९८७-८८ दरम्यान झालेली ४ सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. १९९४-९५ साली झालेली ३ सामन्यांची मालिकाही १-१ अशी बरोबरीत सुटली. मात्र त्यांनंतर २००२-०३, २०११-१२ आणि २०१३-१४ या तीनही कसोटी मालिकांमध्ये भारताने विंडीजला पराभूत केले. २००२-०३ साली ३ सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. तर २०११-१२ मध्ये झालेली ३ सामान्यांची मालिकाही २-०ने भारताने खिशात घातली होती. २०१३-१४ मध्ये झालेल्या २ सामन्यांच्या मालिकेत भारताने निर्भेळ यश मिळवले.