विंडीज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपली पकड मजबूत बसवली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताने २९७ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर इशांत शर्मा आणि इतर भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने विंडीजला २२२ धावांमध्ये गारद केलं. इशांत शर्माने विंडीजचा निम्मा संघ गारद केला. त्याला मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराहने १ बळी घेत चांगली साथ दिली. जसप्रीत बुमराहने मात्र केवळ एक बळी मिळवत दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI : पहिल्या डावात इशांत शर्माची अनोखी कामगिरी, १३ वर्ष अबाधित विक्रमाशी केली बरोबरी

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामने खेळून सर्वात जलद ५० बळींचा टप्पा गाठणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह अव्वल स्थानावर पोहचला आहे. त्याने ११ व्या सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली. बुमराहने वेंकटेश प्रसाद आणि मोहम्मद शमी यांच्या नावावर संयुक्तपणे असलेला १३ सामन्यांचा विक्रम मोडला आहे.

पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने डॅरेन ब्राव्होला १८ धावांवर पायचीत करत पहिला बळी मिळवला. दरम्यान तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताकडे २६० धावांची आघाडी आहे. कर्णधार विराट आणि उप-कर्णधार अजिंक्य अर्धशतकं झळकावत अजुनही मैदानात आहेत. त्यामुळे आजच्या दिवसात भारत आपल्या आघाडीत किती धावांची भर घालतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.