वेस्ट इंडिज अ विरुद्ध भारत हा ३ दिवसांचा सराव सामना अखेर अनिर्णित राहिला. टी २० आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर या सराव सामन्यातील काही खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष होते. त्यानुसार चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, उमेश यादव या खेळाडूंनी आपली चमक दाखवत कसोटी मालिकेसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले. महत्वाचे म्हणजे पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या अजिंक्य रहाणेला दुसऱ्या डावात मात्र सूर गवसला आणि त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली.

सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात १ बाद ८४ धावांपर्यंत मजल मारली होती. अजिंक्य रहाणे २० तर हनुमा विहारी ४८ धावांवर खेळत होता.

तेथून डावाला सुरूवात करताना तिसऱ्या दिवशी दोघांनीही अर्धशतक झळकावले. रहाणेने ५ चौकार आणि १ षटकार यासह ५४ धावा केल्या, तर हनुमा विहारीने ९ चौकार आणि १ षटकार यासह ६४ धावा केल्या. त्यानंतरचे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत, त्यामुळे भारताने ५ बाद १८८ वर डाव घोषित केला आणि वेस्ट इंडिज अ संघाला ३०४ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना सामना संपेपर्यंत वेस्ट इंडिज अ संघाने ३ बाद ४७ धावा केल्या आणि सामना अनिर्णित राखला.

त्याआधी, भारताने २९७ धावांवर पहिला डाव घोषित केल्यानंतर वेस्ट इंडिज अ संघाच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली होती. भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यापुढे ते हतबल ठरले. त्यांचा पहिला डाव १८१ धावांवर आटोपला होता. उमेश यादवने १९ धावांत ३ तर इशांत शर्माने २१ धावांत ३ बळी टिपले. कुलदीप यादवनेही ३५ धावांत ३ बळी घेतले. वेस्ट इंडिज अ संघाकडून कॅवेम हॉज याने सर्वाधिक ५१ धावा केल्या.

तर भारताच्या पहिल्या डावात लोकेश राहुल (३६), मयंक अग्रवाल (१२) आणि अजिंक्य रहाणे (१) हे तिघेही अपयशी ठरले. पण चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनी भारताचा डाव सावरला. पुजाराने दमदार खेळी करत शतक ठोकले आणि त्यानंतर त्याने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटमध्ये अद्याप फारशी चमक दाखवता न आलेल्या रोहित शर्माने या संधीचे सोने केले. त्याने चांगली खेळी करत अर्धशतक ठोकले. तो ८ चौकारांसह ६८ धावा करून बाद झाला. त्यानंतर हनुमा विहारी (नाबाद ३७) व ऋषभ पंत (३३) यांनीही पुरेसा फलंदाजीचा सराव केल्यानंतर भारताने ५ बाद २९७ धावांवर डाव घोषित केला होता.