ऑलिम्किला सज्ज असल्याचा गोळाफेकपटू इंदरजीत सिंगचा निर्धार

‘‘ब्राझीलमध्ये झिका व्हायरसने थैमान घातल्याच्या बातम्या येत आहेत, मात्र भारतीयांमध्ये विविध जटिल आजारांचा सामना करण्याची क्षमता आहे. आपली प्रतिकारक्षमता उत्तम असून, रिओतील ‘झिका’ वगैरे कोणीही सर्वोत्तम कामगिरीपासून रोखू शकत नाही,’’ असे गोळाफेकपटू इंदरजीत सिंगने सांगितले.

इंडियन ऑइल कंपनीत कार्यरत असलेल्या आणि ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या क्रीडापटूंचा सत्कार सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी इंदरजीतने ऑलिम्पिकसाठी सज्जेतेचा इशारा दिला. या कार्यक्रमाला बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत, मनू अत्री, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा यांच्यासह बॅडमिंटनचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद उपस्थित होते.

६ फूट ५ इंच आणि दीडशेहून अधिक वजनाच्या इंदरजीतने आपल्या खुमासदार शैलीत ऑलिम्पिक तयारीचे वर्णन केले. तो म्हणाला, ‘‘अ‍ॅथलेटिक्स विश्वाला उत्तेजकांनी ग्रासले आहे. उत्तेजकांचा वापर होताच कामा नये याबाबत मी ठाम आहे. मात्र उत्तेजकांच्या चाचण्यांमुळे अ‍ॅथलेटिक्सपटूंवर अतिरिक्त दडपण टाकले जाते, असे मत इंदरजीतने व्यक्त केले. उत्तेजक चाचण्यांसाठी नमुने देण्यास माझा नकार नाही, मात्र २४ तास आम्ही कुठे आहोत याचा ठावठिकाणा संघटनेला द्यावा लागतो. ‘सुलतान’ चित्रपट पाहण्यासाठी गेलो त्याचीही नोंद करावी लागते. खेळ गैरव्यवहारमुक्त असावा मात्र त्यासाठी खेळाडूंना वेठीस धरण्यात येऊ नये, असे त्याने सांगितले.’’

‘‘इंडियन ऑइलच्या रूपात मला आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. मात्र त्याआधी सरावासाठी दोन दुकाने विकण्याची वेळ आली होती. असंख्य लोकांकडून कर्जही घेतले होते. २००७ मध्ये वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आई आणि कुटुंबीयांच्या सहकार्याच्या बळावर वाटचाल करतो आहे. हरयाणातील भिवानी येथे गाडय़ांच्या हेडलाइट्सच्या प्रकाशात सराव केला आहे, कारण मैदानावर प्रकाशझोत यंत्रणेची व्यवस्था नव्हती. आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यायामशाळा, आहारतज्ज्ञ आणि खेळांची जाण असलेल्या व्यक्तींची भिवानीत आवश्यकता आहे,’’ असे इंदरजीतने सांगितले. इंदरजीतने गेल्या वर्षी आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. मात्र सरावासाठी प्रतिमहिना लाखभर रुपये खर्च असल्याने बक्षिसे आणि सत्कार सोहळ्याद्वारे मिळणारे पैसे संपल्याचे इंदरजीतने सांगितले.

‘‘ऑलिम्पिकमध्ये जर्मनी, पोलंड, अमेरिकेच्या गोळाफेकपटूंशी कडवी टक्कर आहे. मोक्याच्या क्षणी कच न खाता बिनधास्तपणे सर्वस्व झोकून दिले तरच ऐतिहासिक यश मिळू शकते. ऑलिम्पिकच्या पदार्पणवारीतच पदक पटकावण्याचे दडपण नाही. जगभरातल्या सर्वोत्तम खेळाडूंना टक्कर देत बाजी मारणे हेच उद्दिष्ट आहे,’’ असे इंदरजीतने सांगितले.