भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट सामना म्हंटलं की तो रंगतदार होणारच अशी चाहत्यांची आशा असते. त्यानुसार अनेक सामने हे रंगतदार झालेदेखील. आता ६ तारखेपासून या दोन संघांमध्ये कसोटी मालिका सुरु होणार आहे. पण अनेक चाहत्यांना कदाचित माहित नसलेली बाब म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटच्या संबंधांना आज ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यातही महत्वाचे म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यांनतर भारताने पहिला सामना हा ऑस्ट्रेलियाशीच खेळला होता.

भारतीय संघाने आपला पहिला कसोटी सामना १९३२ साली लॉर्ड्सवर खेळला. मात्र भारत स्वतंत्र झाल्यावर २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधी दरम्यान पहिला कसोटी सामना ब्रिसबेन येथे रंगला. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व लाला अमरनाथ यांच्याकडे होते, तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व सर डॉन ब्रॅडमन यांच्याकडे होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ८ बाद ३८२ धावांवर डाव घोषित केला होता. तर भारताचे दोनही डाव शंभरीआतच संपुष्टात आले होते. भारताने पहिल्या डावात केवळ ५८ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात ९८ धावांपर्यंत भारताला मजल मारता आली होती. त्यामुळे भारताला या सामन्यात १ डाव आणि २२६ धावांनी पराभूत व्हावे लागले होते.

दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या ७१ वर्षात एकूण १२८ कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रलियाने ७३ तर भारताने ४५ सामने जिंकले आहेत. २६ सामने अनिर्णित राहिले, त्यापैकी १ सामना बरोबरीत सुटला होता.