भारताच्या इंदरजितसिंग व जिन्सन जॉन्सन यांनी आशियाई अ‍ॅथलेटिक्स ग्रां.प्रि. स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली. या दोन सुवर्णपदकांबरोबरच भारताने एक रौप्य व पांच कांस्यपदकांचीही कमाई केली.
इंदरजित याने पुरुषांच्या गोळाफेकीत १९.८३ मीटपर्यंत अंतर पार केले. त्याला जरी वीस मीटरचा टप्पा ओलांडता आला नाही, तरी त्याने तीन ग्रां. प्रि. स्पर्धाच्या मालिकेत झकास सुरुवात केली. त्याने याआधी चीनमध्ये झालेल्या आशियाई मैदानी स्पर्धेतही सोनेरी यश मिळविले होते.
जॉन्सन याने भारतास आणखी एक सुवर्णपदक जिंकून देताना आठशे मीटर अंतराच्या शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. त्याने हे अंतर एक मिनिट ४८.५२ सेकंदांत पार केले. महिलांमध्ये याच शर्यतीत भारताच्या एम.गोमती हिला कांस्यपदक मिळाले. तिला हे अंतर पार करण्यास दोन मिनिटे ७.४८ सेकंद वेळ लागला.
पुरुषांच्या लांब उडीत अंकित शर्मा याला रौप्यपदक मिळाले. त्याने ७.७८ मीटपर्यंत उडी मारली. राजीव आरोकिया व एम.आर.पुवम्मा यांनी अनुक्रमे पुरुष व महिलांच्या गटात चारशे मीटर शर्यतीत कांस्यपदक मिळविले. आरोकियाने हे अंतर ४६.८६ सेकंदांत पूर्ण केले तर पुवम्मा हिला ही शर्यत पार करण्यास ५३.५१ सेकंद वेळ लागला.
श्रावणी नंदा हिने शंभर मीटर अंतराच्या शर्यतीत ११.५८ सेकंद वेळ नोंदवित कांस्यपदक मिळविले. गायत्री गोविंदराज हिने १०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक पटकाविले. हे अंतर पार करण्यासाठी तिला १३.७२ सेकंद वेळ लागला. तिहेरी उडीत एन.व्ही.शीना हिला सातवे स्थान मिळाले तर थाळीफेकीत नवज्योत कौर हिला पाचवे स्थान मिळाले.
पुरुषांच्या भालाफेकीत देविंदरसिंग याला सहावा क्रमांक मिळाला. भारताचाच खेळाडू राजिंदरसिंग याने याच क्रीडा प्रकारात तिसऱ्या प्रयत्नात ७०.५८ मीटपर्यंत भालाफेक केली मात्र या प्रयत्नात जखमी झाल्यामुळे राजिंदरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. २६ वर्षीय राजिंदरने फेब्रुवारीत केरळमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. राजिंदरच्या गुडघ्यांची
क्ष-किरण चाचणी करण्यात येणार असून, त्यानंतर दुखापतीचे स्वरुप स्पष्ट होऊ शकेल,असे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितले. सुरुवातीला ही दुखापत मोठी नाही असे राजिंदरसिंगला वाटले. मात्र चालताना अडचण उद्भवल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे नायर यांनी सांगितले.  पुरुष व महिला या दोन्ही गटांत भारतीय संघास चार बाय चारशे मीटर शर्यत पूर्ण करता आली नाही.