News Flash

‘विराट’ नेतृत्वाची कसोटी!

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वक्षमतेवर सध्याच्या सुमार कामगिरीमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com

विश्वचषक २०१९ क्रिकेट स्पर्धा अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. यानिमित्ताने भारताचे १५ खेळाडू जवळपास निश्चित झाले असले तरी, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वक्षमतेवर भारताच्या, तसंच  विशेषत: रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुच्या सध्याच्या सुमार कामगिरीमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकदिवसीय, कसोटी आणि वर्षांतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) दिल्या जाणाऱ्या तिन्ही पुरस्कारांना एकाच वर्षी गवसणी घालणे आजपर्यंत भल्याभल्यांना जमले नव्हते. मात्र आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने हा पराक्रम करून दाखवला. २०१८ या वर्षांतील तिन्ही पुरस्कारांवर त्याने नाव कोरले. त्याशिवाय एकदिवसीय व कसोटी संघाच्या कर्णधारपदीदेखील कोहलीचीच नियुक्ती करण्यात आली. मात्र कोण जाणे त्यानंतर कोहलीच्या नेतृत्वगुणांना काय झाले?

न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकून भारतात परतलेल्या विराटसेनेला ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-ट्वेन्टी आणि एकदिवसीय अशा दोन्ही मालिकांत धूळ चारली. ट्वेन्टी-ट्वेन्टीमध्ये तर ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामन्यांत विजय मिळवून निभ्रेळ यश संपादन केले. एकदिवसीय मालिकेत भारत या पराभवाचा वचपा घेणार असेच चित्र पहिल्या दोन सामन्यांनंतर दिसत होते, परंतु आरोन िफचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने ०-२ अशा पिछाडीवरून ३-२ अशा फरकाने मालिका जिंकण्याची किमया साधली. मायदेशात तब्बल चार वर्षांनी भारताने एकदिवसीय मालिका गमावल्यामुळे समाजमाध्यमांवर कोहलीच्या नेतृत्वकौशल्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला. मुख्य म्हणजे महेंद्रसिंह धोनीला मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्याचा निर्णयदेखील भारताच्या अंगलट आला, असे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले.

कोहलीने स्वत: एकदिवसीय मालिकेत सुरेख कामगिरी करताना दोन शतके लगावली. मात्र चौथ्या सामन्यात धोनीच्या अनुपस्थितीत भारताला ३५९ धावांचा बचाव करणे अशक्य झाले व त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वगुणांवरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले. स्वत: कोहलीनेदेखील मालिका पराभवानंतर आपण नेतृत्वात कोठे तरी कमी पडलो, ही गोष्ट प्रांजळपणे कबूल केली होती. चेंडू फेरफार प्रकरणामुळे वर्षभराची निलंबनाची शिक्षा भोगणारे स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर संघात नसतानादेखील ऑस्ट्रेलियाने मिळवलेले हे यश इतर संघांसाठी धोक्याची घंटा ठरली असून भारतालाही अद्याप बऱ्याच प्रश्नांवर तोडगा काढायचा आहे, हे सर्वाना उमगले.

चौथ्या क्रमांकाचा शोध सुरूच…

जवळपास गेले वर्षभर भारतीय संघ चौथ्या क्रमांकावरील फलंदाज कोण, याचा शोध घेत आहे. सुरेश रैना, अंबाती रायुडू, लोकेश राहुल, दिनेश काíतक आणि हार्दकि पंडय़ा यांसारखे पर्याय वापरूनही भारताला पडलेला चौथ्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच आगामी विश्वचषकासाठी संघ व्यवस्थापन कोहलीशी चर्चा करून अजिंक्य रहाणे किंवा श्रेयस अय्यर यांना संधी देण्याचे धाडस करणार का, हे पाहणे रंजक ठरेल. त्याशिवाय काही क्रिकेटपंडितांनी तर कोहलीला चौथ्या क्रमांकावर पाठवून भारताने राहुल किवा अन्य खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी द्यावी, असेही सुचवले असल्याने भारताच्या विश्वचषक संघनिवडीवर सर्वाचेच लक्ष लागले आहे.

बेंगळूरुतही निराशाच!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आलेले अपयश विसरून कोहली आणि त्याचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आयपीएलमध्ये तरी धमाकेदार कामगिरी करील, अशी अपेक्षा असंख्य चाहते बाळगून होते; परंतु येथेही त्यांच्या पदरी आतापर्यंत निराशाच पडली आहे. कोहलीव्यतिरिक्त एबी डी’व्हिलियर्स, शिम्रॉन हेटमायर, मोईन अली व टीम साऊदी असे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नामांकित खेळाडू असूनही बेंगळूरुला सुरुवातीच्या सहा सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही.

एकीकडे धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचे अनुभवी शिलेदार आणि रोहित शर्माची मुंबई इंडियन्स दमदार कामगिरी करत असताना कोहलीच्या नेतृत्वाखाली बेंगळूरुला येणारे अपयश सर्वच क्रिकेटप्रेमींना सलते आहे. पाच प्रमुख व अनुभवी गोलंदाजांचा अभाव हे बेंगळूरुच्या पराभवामागील एक कारण समजता येईल. त्याशिवाय फलंदाजीचा क्रमही ठरवणे कोहलीला अद्याप जमलेले नाही. फलंदाजीत कोहली सातत्याने योगदान देत असला तरी सांघिक कामगिरी करण्यात व प्रत्यक्षात दडपणाच्या परिस्थितीत अचूक निर्णय घेऊन डावपेच आखण्यात कोहली अपयशी ठरत आहे. त्यामुळे बेंगळूरुचे आव्हान स्पध्रेतून जवळपास संपुष्टात आल्याचेच मानले जात असले तरी कोहली हा भारताचा कर्णधार असल्याने अनेक क्रीडारसिकांना विश्वचषकात काय घडणार, याची भीती आतापासूनच वाटू लागली आहे.

कोहलीवरच सर्वाधिक मदार

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारत जिंकण्याच्या उद्देशानेच खेळला, मात्र अथक परिश्रमानंतरही भारताला पराभव पाहावा लागला. कोहली हा आक्रमक आणि सकारात्मक कर्णधार आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत त्याचे खांदे कधीच खाली झुकलेले नसतात. गेल्या काही सामन्यांत कर्णधार म्हणून तो अपयशी ठरत आहे, ही बाब मात्र मान्य करावी लागेल. आयपीएलमधील कामगिरीचा आढावा घ्यायचा झालाच तर बेंगळूरुचा संघ नेहमीच बेभरवशी व कोहलीवर अतिअवलंबून राहिला आहे. त्याशिवाय उपलब्ध खेळाडूंकडून योग्य कामगिरी कशी काढून घ्यावी, हे बहुदा कोहलीला अद्याप उमगलेले नाही. मात्र विश्वचषकाच्या दृष्टीने या क्षणाला कोणतेही पाऊल उचलणे धोकादायक ठरेल. त्याशिवाय एका मालिकेमुळे त्याच्यावर पराभवाचे संपूर्ण खापर फोडणेही अयोग्य आहे. विश्वचषकात भारताची त्याच्यावरच सर्वाधिक मदार असेल, हे आपण लक्षात ठेवायला हवे. त्याशिवाय विश्वचषकाच्या व्यासपीठावर खेळण्यासाठी पुरेसा अनुभव आवश्यक असल्याने चौथ्या क्रमांकावर दिनेश काíतक किंवा अजिंक्य रहाणेचा पर्याय योग्य ठरू शकतो, असे मला वाटते.
– चंद्रकांत पंडित, माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक.

आयपीएलवरून कोहलीला जोखू नका

कोहली हा एक अतिशय हुशार व अव्वल दर्जाचा फलंदाज आहे, यामध्ये काहीही शंका नाही; परंतु कर्णधार म्हणून त्याला नक्कीच सुधारणेला वाव आहे. संघाची कामगिरी उत्तम झाल्यावर ज्याप्रकारे कर्णधाराचे गोडवे गायले जातात, त्याचप्रमाणे संघ सलग काही सामन्यांत पराभूत झाल्यास कर्णधारालाच त्यासाठी जबाबदार धरले जाते. आयपीएलमध्ये कोहली एकटाच लढताना आपण गेल्या हंगामातदेखील पाहिले. त्याला संघसहकाऱ्यांची साथ न मिळाल्यामुळे संघाची कामगिरी निराशाजनक होत आहे. त्याशिवाय महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीतदेखील त्याने अनेकदा स्वबळावर भारताला कठीण परिस्थितीतून विजयाचा मार्ग दाखवला आहे. म्हणून कोहलीला धोनीच्या सल्ल्याची आवश्यकता आहेच, असे म्हणणे चुकीचे ठरेल. आयपीएलमधील कामगिरीच्या बळावर आपण कोहलीच्या नेतृत्वगुणांची पडताळणी करू शकत नाही. त्याशिवाय विश्वचषक इतका जवळ आलेला असताना कोणताही धोका पत्करणे किंवा संघात बदल करणे मूर्खपणाचे ठरेल. विश्वचषकातील कामगिरीनंतर पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर यांसारख्या युवा खेळाडूंना संघ व्यवस्थापन संधी देऊ शकते. माझ्या मते चौथ्या क्रमांकावर कोहली खेळल्यास संघाला मधल्या षटकांत स्थर्य प्राप्त होईल. त्यामुळे तिसऱ्या स्थानावर राहुल, पंत किंवा रहाणे यांना संधी देण्यास काहीही हरकत नाही. परंतु हीसुद्धा एक जोखीम असल्यामुळे संघ व्यवस्थापन कोहलीला तिसऱ्या क्रमांकावरच कायम ठेवण्याची शक्यता आहे.
– अभेय कुरुव्हिला, माजी क्रिकेटपटू
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 1:01 am

Web Title: india 2019 icc odi world cup virat kohali captainship
Next Stories
1 पिंकी राणी उपांत्यपूर्व फेरीत; भारताची दोन पदके निश्चित
2 IPL 2019 : धोनीची ‘शंभर नंबरी’ कामगिरी ! अनोखी कामगिरी करणारा पहिला कर्णधार
3 बायकोच्या वाढदिवसाला सबब नाही, सामन्याआधी अजिंक्य-राधिकाचं बर्थ-डे सेलिब्रेशन
Just Now!
X