अक्षर पटेल आणि अन्य भारतीय खेळाडूंनी केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर पहिल्या वन-डे सामन्यात, भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघावर ६९ धावांनी मात केली आहे. शिवम दुबे, अक्षर पटेल आणि शुभमन गिल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारत अ संघाने ३२७ धावांपर्यंत मजल मारली. आफ्रिकेचा संघ २५८ धावांपर्यंतच मजल मारु शकला. ३२८ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेकडून रेझा हेंड्रीग्जने शतक तर हेन्रिच क्लासेनने अर्धशतकी खेळी केली, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.

तिरुअनंतरपुरमच्या मैदानात आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड १० धावा काढून माघारी परतला. यानंतर इतर भारतीय फलंदाजांनी वेळेतच संघाचा डाव सावरला. आघाडीच्या फळीत शुभमन गिल कर्णधार मनिष पांडेने आश्वासक खेळी केली. अखेरच्या फळीत शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांनी फटकेबाजी करत भारत अ संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. अक्षर पटेलने आफ्रिकन गोलंदाजांचा सामना करत ३६ चेंडूत ६० धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

३२८ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाची सुरुवात संमिश्र झाली. ८१ धावांमध्ये आफ्रिकेचे पहिले ३ फलंदाज माघारी परतले. युजवेंद्र चहलने आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांना माघारी धाडलं, मात्र दुसऱ्या बाजूने रेझा हेंड्रीग्जने आफ्रिकेच्या डावाला आकार दिला. मधल्या फळीत यष्टीरक्षक हेन्रिच क्लासेनने अर्धशतक झळकावत हेंड्रीग्जला चांगली साथ दिली. मात्र भारतीय गोलंदाजांनी ही जोडी फोडत आफ्रिकेला पुन्हा बॅकफूटवर ढकललं. युजवेंद्र चहलने आफ्रिकेच्या तळातल्या फलंदाजांना झटपट गुंडाळत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ५ सामन्यांच्या मालिकेत भारत अ संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे.