कर्णधार मनिष पांडेच्या नेतृत्वाखाली भारत अ संघाने सलग दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं १६३ धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी २ गडी राखत पूर्ण केलं. सामन्याआधी आलेल्या पावासमुळे खेळपट्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या कारणासाठी सामना २१ षटकांचा खेळवण्यात आला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकून कर्णधार मनिष पांडेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलग दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. जानेमन मलन आणि रेझा हेंड्रीग्ज झटपट माघारी परतले. मात्र यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा, यष्टीरक्षक हेन्रिच क्लासेन यांनी फटकेबाजी करत आफ्रिकेच्या संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. अखेरच्या फळीत जॉर्ज लिंडेने फटकेबाजी करत २५ चेंडूत ५२ धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत ५ षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. यामुळे आफ्रिकेच्या संघाने १६२ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून दिपक चहर, खलिल अहमद, युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. आफ्रिकेचा एक फलंदाज धावबाद झाला.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारत अ संघाची सुरुवातही खराब झाली. ऋतुराज गायकवाड हेंड्रीग्जच्या गोलंदाजीवर मलनकडे झेल देत माघारी परतला. यानंतर शुभमन गिल, अनमोलप्रीत सिंह आणि कर्णधार मनिष पांडेही ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. मात्र मधल्या फळीत यष्टीरक्षक इशान किशनने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. किशनने कृणाल पांड्याच्या साथीने महत्वाची भागीदारी रचत अर्धशतक झळकावलं. त्याने २४ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ५५ धावांची खेळी केली. इशान किशन माघारी परतल्यानंतर आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताच्या तळातल्या फळीतला फलंदाजांना झटपट माघारी धाडत सामन्यात रंगत आणली. मात्र कृणाल पांड्याने अखेरपर्यंत मैदानात तग धरत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.