महाराष्ट्राचा उदयोन्मुख खेळाडू ऋतुराज गायकवाडच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर, भारत अ संघाने श्रीलंका अ संघावर ४८ धावांनी मात केली आहे. ऋतुराजने १३६ चेंडूत नाबाद १८७ धावा केल्या. त्याच्या या खेळीत २६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारत अ संघाने ३१७ धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेचा संघ २६९ धावांपर्यंत मजल मारु शकला.

सलामीवीर शुभमन गिल माघारी परतल्यानंतर ऋतुराज गायकवाडने अनमोलप्रीत सिंह आणि इशान किशन यांच्यासोबत महत्वाच्या भागीदारी रचल्या. ऋतुराजने लंकेच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. त्याच्यावर अंकुश लावण्याचं काम एकाही श्रीलंकन गोलंदाजाला जमलं नाही. लंकेकडून लहिरु कुमाराने ३ तर अशन प्रियंजनने १ बळी घेतला.

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या श्रीलंका अ संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर निरोशन डिकवेला आणि सदिरा समरविक्रमा हे ठराविक अंतराने माघारी परतले. मधल्या फळीत भनुका राजपक्षे आणि सेहन जयसुर्या यांनी भारतीय गोलंदाजांना चांगली झुंज दिली. जयसूर्याने १०८ धावांची नाबाद शतकी खेळी केली. मधल्या फळीत दसुन शनका आणि इतर फलंदाजांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. भारताकडून मयांक मार्कंडने २ बळी घेतले. त्याला तुषार देशपांडे, संदीप वारियर, शिवम दुबे आणि दिपक हुडा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.