म्हैसूर : भारत ‘अ’ संघाचा प्रतिभावान फलंदाज प्रियांक पांचाळने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या चारदिवसीय कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात झुंजार शतक झळकावले. परंतु दिवसाचा खेळ संपल्यावर पंचांनी हा सामना अनिर्णित जाहीर केल्यामुळे भारताने या मालिकेत १-० असे यश संपादन केले.

गुरुवारच्या बिनबाद १४ धावांवरून पुढे खेळताना भारताने सावध खेळ केला. पहिल्या डावात भारताला फक्त १७ धावांची आघाडी घेण्यात यश आल्यावर दुसऱ्या डावात भारताचे सलामीवीर प्रियांक आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी ९४ धावांची सलामी दिली. अभिमन्यू (३७) बाद झाल्यावर गेल्या डावातील अर्धशतकवीर २० वर्षीय शुभमन गिलसुद्धा शून्यावरच माघारी परतला.

गुजरातच्या प्रियांकने ९ चौकार आणि ४ षटकारांसह १०९ धावा करून सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकवला. त्याने करुण नायरसह तिसऱ्या गडय़ासाठी ८२ धावांची भागीदारी रचली. प्रियांक बाद झाल्यावर करुण (नाबाद ५१) आणि वृद्धिमान साहा (नाबाद १) यांनी उर्वरित षटके खेळून काढली.