X

ऑस्ट्रेलियन हॉकीलिग स्पर्धेत भारत ‘अ’ संघाची चमकदार कामगिरी

तरुण खेळाडूंची आश्वासक कामगिरी

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारत ‘अ’ हॉकी संघाने ऑस्ट्रेलियन हॉकीलिगच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. ‘ब’ गटात भारत दुसऱ्या स्थानावर राहिला. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाला ४-१ ने हरवत भारतीय संघाने आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात चांगली केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात लगेचच भारताला न्यू साऊथ वेल्सकडून ०-१ अशी हार पत्करावी लागली होती. नॉर्दन टेरिटरीविरुद्ध भारतीय संघाला १-१ अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं होतं. तर चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी संघाविरुद्ध आक्रमक खेळ करत भारतीय संघाने सामना २-० असा जिंकला.

‘अ’ आणि ‘ब’ गटातील पहिल्या दोन क्रमांकाचे संघ या स्पर्धेतील पुढच्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे न्यू साऊथ वेल्स आणि भारत ‘अ’ या संघाना अ गटातील व्हिक्टोरिया आणि क्विन्सलँड या संघांशी दोन हात करावे लागणार आहेत. साखळी फेरीत ‘ब’ गटात खेळताना भारताने दोन विजय, एक पराभव आणि एक बरोबरी या जोरावर ७ गुणांसह दुसरं स्थान पटकावलं.

आगामी ऑलिम्पिक आणि महत्वाच्या स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन हॉकी इंडियाने तरुण खेळाडूंना यंदा ऑस्ट्रेलियन हॉकीलिग स्पर्धेत पाठवलं. ज्याचा खेळाडूंना चांगला फायदा होताना दिसतं आहे. त्यामुळे वर्ल्ड हॉकीलिग, विश्वचषक यासारख्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सध्या भारतीय पुरुषांचा संघ बांगलादेशात आशिया चषक खेळणार आहे. त्यानंतर भारतात वर्ल्ड हॉकीलिग आणि विश्वचषक या दोन महत्वाच्या स्पर्धा होणार आहेत.

First Published on: October 4, 2017 5:33 pm
  • Tags: hockey-india,
  • Outbrain