अशोक मनेरियाने पाच बळी घेत न्यूझीलंड ‘अ’ संघाचा डाव ४७.२ षटकांत २१६ धावांत गुंडाळला. त्यानंतर उन्मुक्त चंद आणि मनदीप सिंगने वैयक्तिक अर्धशतके झळकावून पाया रचला. मग पुन्हा मनेरियाने केदार जाधवच्या साथीने किवी आव्हान पेलत भारत ‘अ’ संघाला सहा विकेट राखून विजय मिळवून दिला. भारत ‘अ’ संघाने दुसऱ्या सामन्यासह तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली आहे.
डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर मनेरियाने १०-०-३८-५ अशी जबरदस्त गोलंदाजी केली. धवल कुलकर्णीने दोन बळी घेतले, तर बसंत मोहंती आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला. न्यूझीलंडकडून कार्ल कॅचोपाने १०३ चेंडूंत सर्वाधिक ८० धावा केल्या. या खेळीत नऊ चौकारांचा समावेश होता. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने योग्य साथ मिळाली नाही.
त्यानंतर यजमानांनी ११.१ षटके राखून विजयावर मोहोर उमटवली. चंद (५९) आणि मनदीप (५९) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०३ चेंडूंत ८९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मग केदार जाधव (३०) आणि अशोक मनेरिया (३७) यांनी ४५ चेंडूंत नाबाद ५३ धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 11, 2013 1:00 am