मनीष, कृणाल यांच्या योगदानामुळे वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा १४८ धावांनी धुव्वा

नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) : कर्णधार मनीष पांडेने साकारलेले दमदार शतक आणि कृणाल पंडय़ाने मिळवलेल्या पाच बळींच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने बुधवारी वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १४८ धावांनी धुव्वा उडवला.

भारताने दिलेल्या २९६ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात विंडीज ‘अ’ संघाचा डाव ३४.२ षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली असून मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी खेळला जाईल.

प्रथम फलंदाजी करताना भारताने शुभमन गिल (७७) आणि श्रेयस अय्यर (४७) या युवा खेळाडूंनी दुसऱ्या गडय़ासाठी रचलेल्या १०९ धावांच्या भागीदारीमुळे दमदार सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या मनीषने चौकार-षटकारांची आतषबाजी करत ८६ चेंडूंत सहा चौकार व पाच षटकारांसह शतक झळकावले. मात्र पुढच्याच चेंडूवर तो माघारी परतला. अखेरच्या षटकांत इशान किशनने झटपट २४ धावा फटकावल्यामुळे भारत ‘अ’ संघाने ५० षटकांत ६ बाद २९५ धावा केल्या.

प्रत्युत्तरादाखल, तळाच्या किमो पॉल (३४) आणि सलामीवीर सुनील अ‍ॅम्ब्रिस (३०) यांना वगळता एकही विंडीज फलंदाज तिशी गाठू शकला नाही. पंडय़ाच्या फिरकीने पाच फलंदाजांना माघारी पाठवले, तर हनुमा विहारीन दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

भारत ‘अ’ : ५० षटकांत ६ बाद २९५ (मनीष पांडे १००, शुभमन गिल ७७, श्रेयस अय्यर ४७; रॅकीम कोनवॉल २/३७) विजयी वि. वेस्ट इंडिज ‘अ’ : ३४.२ षटकांत सर्वबाद १४७ (किमो पॉल ३४, सुनील अ‍ॅम्ब्रिस ३०; कृणाल पंडय़ा ५/२५).

’ सामनावीर : मनीष पांडे

मनीष पांडे

धावा    १००

चेंडू     ७७

चौकार  ६

षटकार  ५