मिताली राजच्या विक्रमी नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारत ‘अ’ संघाने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा २८ धावांनी पराभव केला आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली.

अनुभवी मितालीने फक्त ६१ चेंडूंत १८ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १०५ धावांची खेळी साकारली. तिने ३१ चेंडूंत अर्धशतक आणि ५९ चेंडूत शतक पूर्ण केले. याचप्रमाणे महिलांच्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक १०२ धावा काढणाऱ्या स्मृतीचा विक्रमही तिने मोडित काढला. स्मृती मानधना (१), जेमिमा रॉड्रिगेज (५), डी. हेमलता (२) आणि अनुजा पाटील (०) लवकर बाद झाल्यानंतर मितालीच्या खेळीमुळे भारताला २० षटकांत ५ बाद १८४ धावांचे अवघड आव्हान उभारता आले. कर्णधार हरमनप्रीत कौरने (३३ चेंडूंत ५७ धावा) तिला छान साथ दिली. या दोघींनी ८५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला निर्धारित षटकांत ९ बाद १५६ धावसंख्येवर रोखले. सलामीवीर ताहिला मॅकग्राने सर्वाधिक ४७ धावा केल्या.