भारत ‘अ’ व ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील पहिल्या अनधिकृत क्रिकेट कसोटीला बुधवारी सुरुवात होत असून भारताच्या या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनकौशल्याची ही पहिली कसोटी आहे.
चेतेश्वर पुजारा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उतरणार आहे. भारताच्या वरिष्ठ संघात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी तो उत्सुक असून हा सामना त्याच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. पुजाराने यापूर्वी २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकांमध्ये भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व केले होते. येथे पुन्हा त्याच्या नेतृत्वगुणांची परीक्षा असणार आहे. त्याच्याबरोबरच फलंदाज के. एल. राहुल, अभिनव मुकुंद, फिरकी गोलंदाज अमित मिश्रा व प्रग्यान ओझा, वेगवान गोलंदाज वरुण आरेन, उमेश यादव, अभिमन्यू मिथुन यांच्या कामगिरीबाबतही उत्सुकता आहे. बाबा अपराजित, विजय शंकर यांच्यावरही भारताच्या फलंदाजीची मदार आहे.
खेळपट्टीची फिरकी गोलंदाजीला साथ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची मुख्य भिस्त अ‍ॅश्टोन अ‍ॅगर, स्टीफन ओकेफी या फिरकी गोलंदाजांवर आहे.
फलंदाजीची मुख्य मदार धडाकेबाज फलंदाज उस्मान ख्वाजा याच्यावर आहे. डाव्या पायाच्या दुखापतीमधून तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. तो अव्वल दर्जाचा फलंदाजही आहे. त्याच्याबरोबरच जो बर्न्‍स, निक मॅडिसन, अष्टपैलू खेळाडू माकरेस स्टोनिस, यष्टिरक्षक व फलंदाज मॅथ्यु वेड यांच्यावर ऑस्ट्रेलियाचे यशापयश अवलंबून आहे.