भारत ‘अ’ संघाची सामन्यावर मजबूत पकड 

थिरुवनंतपुरम : कर्णधार शुभमन गिलला दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या पहिल्या चारदिवसीय कसोटी सामन्यात शतकाने हुलकावणी दिली; परंतु त्याने केलेल्या ९० धावा आणि जलज सक्सेनाच्या नाबाद अर्धशतकामुळे भारत ‘अ’ संघाने पहिल्या डावात आफ्रिकेवर एकूण १३९ धावांची आघाडी घेतली.

भारताचा पहिला डाव ३०३ धावांवर संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेची ५ बाद १२५ धावा अशी अवस्था झाली असून ते अद्यापही भारतापासून १४ धावांनी पिछाडीवर आहेत. दुसऱ्या डावात भारतातर्फे शाहबाज नदीमने दोन, तर कृष्णाप्पा गौतम, शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला आहे. यष्टिरक्षक हेन्रिच क्लासेन ३५, तर विआन मल्डर १२ धावांवर खेळत आहेत.  गिलने पहिल्या डावात १३ चौकार व एका षटकारासह ९० धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

’ दक्षिण आफ्रिका ‘अ’ (पहिला डाव) : १६४

’ भारत ‘अ’ (पहिला डाव) : ८७.५ षटकांत सर्व बाद ३०३ (शुभमन गिल ९०, जलज सक्सेना ६१*, शार्दुल ठाकूर ३४; लुंगी एन्गिडी ३/५०)

’ दक्षिण आफ्रिका ‘अ’ (दुसरा डाव) : ३५ षटकांत ५ बाद १२५ (झुबेर हम्झा ४४, हेन्रिच क्लासेन खेळत आहे ३५, विआन मल्डर खेळत आहे १२; शाहबाज नदीम २/१३).