News Flash

अखेरच्या वन-डे सामन्यात विजयासह भारत अ संघाने मालिका जिंकली

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचं शतक एका धावेने हुकलं

पाचव्या अनौपचारिक एकदिवसीय सामन्यात भारत अ संघाने वेस्ट इंडिज अ संघावर मात करत मालिकेत ४-१ ने बाजी मारली आहे. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेलं २३७ धावांचं आव्हान भारतीय संघाने केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारतीय संघाचे सलामीवीर शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी आक्रमक अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शुभमन गिलने ६९ तर ऋतुराज गायकवाडने ९९ धावा केल्या. भारतीय संघाने ३३ व्या षटकातच वेस्ट इंडिजने दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

शुभमन गिलने आक्रमक सुरुवात करत २९ चेंडूत अर्धशतक झळकावलं. या मालिकेतलं गिलचं हे तिसरं अर्धशतक ठरलं. शुभमन गिल फटकेबाजी करत असताना ऋतुराज गायकवाडने एका बाजूने किल्ला लढवत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. शुभमन गिल माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरने ऋतुराजच्या साथीने संघाचा डाव सावरला. ऋतुराजने फटकेबाजी करत भारतीय संघाची धावसंख्या भराभर वाढवण्याकडे कल दिला. ९९ धावांवर ऋतुराज माघारी परतला, केवळ एका धावेने त्याचं शतक हुकलं. ऋतुराज माघारी परतल्यानंतर कर्णधार मनिष पांडेने श्रेयस अय्यरच्या साथीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत वेस्ट इंडिज अ संघाला २३६ धावांवर रोखलं. नवदीप सैनीने १० षटकात ३१ धावा देत २ गडी बाद केले. त्याला चहार बंधू आणि कृणाल पांड्याने चांगली साथ दिली. वन-डे मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये २४ जुलैपासून अनौपचारिक कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2019 2:45 pm

Web Title: india a win with 17 overs to spare as top order unleashes on west indies a psd 91
टॅग : Bcci,India A
Next Stories
1 प्रो कबड्डी खेळल्याचा अनुभव पथ्यावर!
2 विजेतेपदाची पुन्हा हुलकावणी!
3 मी चुकलो, पण निर्णयाचे शल्य नाही -धर्मसेना
Just Now!
X