लखनौ : कर्णधार हरमनप्रीत कौरची अनुपस्थिती भारतीय महिला संघाला महागात पडली. सलामीवीर अ‍ॅनेक बोश (नाबाद ६६) आणि कर्णधार सून लूस (४३) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला आठ गडी आणि पाच चेंडू राखून सहज धूळ चारली.

भारताने दिलेले १३१ धावांचे लक्ष्य आफ्रिकेने १९.१ षटकांत गाठले. बोश आणि लूस यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ९० धावांची भागीदारी रचून आफ्रिकेचा विजय साकारला. या विजयासह आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना हरलीन देओलच्या ४७ चेंडूंतील ५२ धावांच्या खेळीमुळे भारताने २० षटकांत ६ बाद १३० धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार स्मृती मानधना (११), शफाली वर्मा (२३), जेमिमा रॉड्रिग्ज (३०) चांगल्या सुरुवातीचा लाभ उचलण्यात अपयशी ठरले.

आज दुसरा ट्वेन्टी-२० सामना

वेळ : सायंकाळी ७ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २